राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज ज्येष्ठ नेते रामनाथ कोविंद यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. सध्या बिहारच्या राज्यपालपदी विराजमान असलेले कोविंद कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द काय, याबद्दलची माहिती अशीः १ ऑक्टोबर १९४५ ला उत्तर प्रदेशातील कानपूरमधल्या छोट्या गावात दलित कुटुंबात जन्म कानपूर विद्यापीठातून वाणिज्य आणि विधी शाखेची पदवी एप्रिल १९९४ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती. मार्च २००६ पर्यंत, सलग १२ वर्षं खासदारकी. रामनाथ कोविंद हे पेशाने वकील आहेत. १९७७ ते १९७९ या काळात दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर पुढची १३ वर्षं त्यांनी सुप्रीम कोर्टात केंद्राची बाजू मांडली. अनेक महत्त्वाच्या संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. १९९८ ते २००२ या काळात कोविंद यांनी भाजप दलित मोर्चाचं अध्यक्षपद सांभाळलं.अखिल भारतीय कोळी समाजाचेही ते अध्यक्ष होते. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही जबाबदारी सांभाळली. लखनऊमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि कोलकात्याच्या आयआयएममध्ये ते बोर्ड मेंबर होते. संयुक्त राष्ट्रातही कोविंद यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. ८ ऑगस्ट २०१५ रोजी राष्ट्रपतींनी बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.