वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे राष्ट्रीय सकल उत्पादनात एक ते दोन टक्क्यांनी वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे राज्यमंत्री सी आर चौधरी यांनी केले. ते आज पणजीमध्ये आयोजित जीएसटी चर्चासत्राच्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठार मांगिरीश पै रायकर आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्र्यांना विविध राज्यांमध्ये जाऊन व्यापार आणि उद्योगजगत तसेच जीएसटीशी संबंधित सर्व यंत्रणांशी संवाद साधण्यास सांगितेल आहे. त्याचाच भाग म्हणून सी आर चौधरी आज गोव्यात होते. केंद्र सरकारने १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) देशभर लागू केला आहे. स्वातंत्र्यानंतरचे हे ऐतिहासिक आर्थिक सुधारणा धोरण असल्याचे चौधरी यांनी म्हटले. जीएसटीच्या अंमलबजावणीसंदर्भात जीएसटी परिषदेने सर्वानुमते निर्णय घेऊन वेळोवेळी दुरुस्त्या केल्या. देशाच्या विकासासाठी एकात्मिक करप्रणाली लाभदायक ठरत असल्याचे सांगत श्री चौधरी यांनी जीएसटीच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल जीएसटी आयुक्तालयाचे कौतुक केले.
गेल्या चौदा दिवसांमध्ये शेअर बाजारात असलेली तेजी ही जीएसटीच्या यशाचे निदर्शक असल्याचे सी आर चौधरी म्हणाले. जीएसटीमुळे करचोरीला आळा बसून देशभर मालाची वाहतूक सुलभ झाली असल्याचे सांगितले.
जीएसटी आयुक्त अनपाझकन यांनी आयुक्तलयाकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.