आम्ही आमच्या मुलासाठी जेव्हा शाळेची निवड करत होतो तेव्हा शाळेचा धर्मनिरपेक्ष पणा (त्यातल्यात्यात ) हा एक महत्वाचा निषक होता . म्हणून परवा शाळेतून ख्रिश्चन धर्मियांसाठी मास आणि हिंदूसाठी पूजेच आयोजन शाळेतर्फे करण्यात येणार आहे अस सर्कुलर आल आणी मी चक्रावले

. खरच गरज आहे का ह्या अश्या कोवळ्या मनां मध्ये फुट पाडणाऱ्या कार्यक्रमांची आणि तीही शाळे सारख्या संस्थामध्ये. धर्म , जाती, वर्ण ह्या गोष्टीना ह्या लहानग्यांचा जगात काहिच प्राधान्य नसत. ती आपल्या भोवती लाघवीपणे गोळा करतात ती फक्त माणस असतात त्यांच्यासाठी . पण मग मास् च्या दिवशी उशीरान आली ती ख्रिश्चन आणि पूजेच्या दिवशी उशीरान आला तो हिंदू इथपासून सुरु होवून मग सगळ्यांचच वर्गीकरण सुरु होत . एरवीच घरातुन , धार्मिक संस्थामधून भेदभावाचे बाळकडू पाजण चालू असतच त्यात शाळेन भर टाकण केवढ इष्ट आहे आणि त्यातून नक्की काय साधल जावू शकत हाच खरा प्रश्न आहे .

ह्या संदर्भात माझ्या लहानपणीच्या दोन आठवणी मला सांगाव्याशा वाटतात . आमच्या दिवाडीच्या शाळेत ख्रिश्चन मुलांसाठी धार्मिक शिक्षणाचा तास असायचा आणि त्या वेळी ख्रिश्चनेतर मुलांसाठी मोरल सायन्स (नीती शिक्षण) चा तास असायचा. हे विभाजन करायला सोप जाव म्हणून शाळेत प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या असायच्या . ख्रिश्चन मुलांची अ तुकडी आणि हिंदू आणि इतर ख्रिश्चनेतर मुलांची ब तुकडी.

तर शाळेत माझी एक जीवश्च कंठश्च मेत्रीण होती प्रीस्का. आम्ही दोघी एकमेकींच्या इतक्या जवळ होतो कि मला लागल तर तिच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि तिला कुणी काही म्हटल तर मला लागायचं. शाळेतर्फे जेव्हा वर्गवार खो खो किंवा कब्बडी मेचेस घेतल्या जात . त्या वेळी हि आमची प्रीस्का माझ्या हाताल घट्ट धरून जोरजोराने ओरडायची ” ए कोकण्याची क्लास जीकोना जाल्यार पुरो गो !” आणि मग जेव्हा तिला पाहिजे त्या तुकडीला गुण मिळायचे तेंव्हा तिला बर वाटतय म्हणून मी पण तिच्या बरोबर जोरजोराने टाळ्या वाजवायचे. त्या वेळी आमच्या दोघींच्या गावीही नसायचं कि आम्ही ह्या धर्माच्या नावावरील दुफळीच्या दोन विरुद्ध बाजूंच्या प्रतिनिधी आहोत. त्या वयात तरी आम्ही फक्त एकमेकांशी माणुसकीच्या नात्यान बांधलेल्या होतो. पण काळा बरोबर हा निरगस पणा विरून जातो आणि वरचढ होते ती समाजाने, घराने अथवा शाळेने धर्म , जात , वर्ण करत या ना त्या प्रकारे मनावर बिम्बवलेली दूफळी आणि भेदभाव.

मानवाच्या सामाजिक , मानसिक आणि आर्थिक उन्नतीला जराही गरजेच्या नसलेल्या आणि प्रगल्भतेच्या आणि सारासार विवेकाने विचार करण्याच्या आड येणाऱ्या कितीतरी गोष्टी आम्हाला कोवळ्या वयापासून देव धर्माच्या नावाने शिकवल्या जातात. कुटुंब , धार्मिक संस्था ह्याचं एक ठीक आहे पण शाळानीही धर्माचा उदो उदो चालवला तर कशी मिळेल भारताच्या भावी नागरिकांना Religiously Neutral Space. एक अशी जागा जिथ माणसाला माणसांन माणसासारख वागल पाहिजे हे त्यांच्या मनावर कृतीतून प्रभावीपणे बिंबवल जाईल. कस उमजायचं ह्या मुलांना कि पुढ्यात आलेल्या माणसाच वर्गीकरण न करता त्याच्यातल्या गुणा अवगुणानुसार त्याची पारख करायची असते. धर्माची जागा वैयक्तिक आयुष्यात कितीही महत्वाची असली तरी सामाजिक जीवनात माणुसकिला परम महत्व दिलच पाहिजे. त्या शिवाय देशाची आणि येणाऱ्या भावी पिढ्यांची प्रगती खऱ्या अर्थान शक्यच नाही . ह्या पूर्वग्रहदुषित तकलादू कोशातून बाहेर पडलेली मुलच सारासार विवेक बुद्धीन विचार करून योग्य निर्णय घेवून आपल अन समाजच भल करू शकतील .

पण पुढच्या पिढीला ह्या वाटेवर घेवून जाण्याची निकड कुणालाच वाटत नाही , ना पालकांना , ना समाजाला . उलट सगळ्याच धर्मांमध्ये नव्या पिढीला पुराण्या कर्मकांडांत गुरफठवून ठेवण्याची जणू अहमिकाच लागलेली दृष्टीस पडते. ह्या सर्वातून आम्ही पुढे उज्वल भविष्य असूनही मागे जायचे दरवाजेच चाचपडत राहू .

आमच्या शाळेत मी आठवीत असताना दोन विदेशी मुल भरती झाली होति. आम्हाला त्यांचा हेवा वाटायचा कारण कि आम्ही जेव्हा Moral Science वा Religion करत वर्गात बसलेलो असायचो तेंव्हा हि दोन्ही मुल बाहेर मस्त हुंदडायची. त्यांच्या पालकांकडून शाळेला सक्त ताकीद आणि standing Instructions होती कि ना ह्या मुलांना हिंदू मुलांबरोबर Moral Science ला पाठवायचं ना ख्रिश्चन मुलांबरोबर religion शिकायला . त्या वेळी ह्या विषयावर खूप उलट सुलट चर्चा व्हायची नि त्या पालकांच्या शिष्ठ पणाच्या नावान बोट मोडली जायची. पण खरतर धर्माच्या अनुशंगान येणाऱ्या भेदभावाची आपल्या मुलांना जाणीव होवू नये म्हणून त्या जागरूक पालकांचा हा अट्टाहास होता हे आत्ता कळत.

भारतीय संविधांनान आम्हाला दिलेल्या हक्काबद्दल आम्ही खूप जागरूक असतो. कुणी आमच्या हक्कांची पायमल्ली केली तर आम्ही ती कधीच खपवून घेत नाही . पण त्याच संविधानाने आमच्या साठी आखून दिलेल्या कर्तव्यांवर आम्ही सोयीस्कर पणे विसर घालतो. १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार वैद्यानिक दृष्टीकोनाची जोपासना करण आणि ईतरानाही करायला लावण हि प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. ह्यादृष्टीने भावी पिढी घडवणाऱ्या संस्था म्हणून शाळांनि सगळ्यात आधी पुढाकार घ्याला हवा. नरेंद्र दाभोलकरांसारख्या सामाज प्रबोधकांची अडचण वाटावी अशा प्रवृत्या निर्माण होवू नये अस वाटत असेल तर समाजान डोळसपणे भावी पिढीची योग्य प्रकारे जडणघडन होते कि नाही ह्यावर लक्ष दिलच पहिजे. आत्ता आम्ही त्यांची मन आमच्या राजकीय वा अन्य फायद्यांसाठी कलुषित केली तर मग उद्या हीच मुल निर्माणकर्त्याच्या डोक्यावरच भास्मासुराप्रमाण हात ठेवून मोकळी होतील ह्याची जाणीव प्रत्येकान ठेवावी . जास्तकरून धर्माच्या नावावर स्वतःच स्तोम माजवणाऱ्यानि .
हल्लीच एका उच्च विद्या विभूषित प्राध्यापिकेच कोकणी पुस्तक वाचनात आल . मित्रांबरोबर अभक्ष भक्षण करणाऱ्याना हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही . देवस्थानानि असल्या लोकांना बाहेर घालवून दिल पाहिजे अशी काहीतरी विधान बाई करतात. धार्मिक मुलतत्व वाद्यांपेक्षा अशा एकांगी विचार करणाऱ्या शिक्षक, पालाकांपासुंनच पुढच्या पिढीला जास्त धोका आहे.

वैयक्तीक आयुष्यात देव हि संकल्पना अनेकांना रोजच्या ताणतणावातून दिलासा देणारी, नैराश्यातून उठवणारी, मन शांती आणि सात्विक आनंद देणारी आणि म्हणूनंच हवी हवीशी वाटणारी आहे.कुठतरी वाचनात आल होत कि देवाची संकल्पना हि जुन्या घरांच्या पडवीत असणाऱ्या खुंटी सारखी आहे. बाहेरून घरात आल्या नंतर खांद्यावरच ओझ खुंटीवर टाकायचं अन काहीवेळ तरी निश्चिंत व्हायचं. तसच मनावरच्या ओझ्याला काहि वेळा साठी तरी देवावर टाकायचं आणी ताजतवानं होवून परत नव्या जोमान कामाला लागायचं. हिच ह्यातली खरी गोम.पण जेव्हा हीच देवाची संकल्पना सामाजिक आयुष्यात कर्मकांड बरोबर घेवून धर्म बनून समोर येते तेंव्हा तिचा वैयक्तिक स्वार्थ साधण्या हेतून भेदभावांना खत पाणी घालण्यासाठी सर्रास वापर होतो हीच खरी दुखांन्तिका आहे. धर्माच्या नावावर काहीही खपून जात . भावना सहजपणे चेतवल्या जातात . आणि त्या ओघात सामान्यांकडून कधीकधी माणुसकीला काळिमा लावणारी कृत्यहि करवून घेतली जातात. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आपल्या धर्म आणि देवाप्रतीच्या नाजूक भावनांचा गैरफायदा घेवून कित्येक जण आपल वर्चस्व प्रस्थापित करून आपली आर्थिक आणि राजकीय पोळी भाजून घेतात.

हे अस वर्षानुवर्ष चालल पाहिजे , बळीचे बकरे मिळाले पाहिजेत , चेतवून घालण्या साठी आणी आतंक माजवण्यासाठी सामान्य जनता पाहिजे म्हणून पुढच्या पिढीच्या डोळ्यांवर धर्माचे (आपल्याला पाहिजे त्या सोयीस्कर रंगांचे)चष्मे लावण्याची अहमिका प्रत्येक धर्मात लागतेच आहे. हे असच चालू राहील तर आमची नवी पिढी नव्या युगाचे शिलेदार खऱ्या अर्थान कधीच होणार नहित, भेद भावाच्या , कर्मकांडांच्या भूलभूलय्यात हरवून नवे शोध, नव्या वाट , नव्या संकल्पना, सृजनाचे नवे अविष्कार करण्याच्या वाटेवर कधी पोहोचूच शकणार नाहीत.

ह्या पार्शवभूमीवर प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे ती जागरूक राहून स्वतःच्या मुलांना एक व्यापक , वैश्विक , धर्मानिरपेक्ष दृष्टीकोन देण्याची . शाळानीही धर्माची कास न धरता ज्ञान , विज्ञानाची पाठराखण करायलाच पहिजे. ज्ञानमंदिरानि धर्मपीठ होण्याचा हव्यास सोडून राष्ट्र निर्माणासाठी कंबर कसलीच पहिजे. तेच त्यांचे आद्य कर्तव्य हि असायला हवे आणि पूजाही,मास हि अन नमाज हि !