निवडणूक लढवणे खायची गोष्ट नाही म्हणतात ते उगाच नाही.निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि निवडणूक लढवणारा पैसेवाला लागतो.पणजी आणि वाळपई पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेले 7 पैकी 5 उमेदवार करोड़पती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या दस्तऐवजानुसार स्पष्ट झाले आहे.आपल्या सध्या राहणीसाठी देशात प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री तथा पणजीचे भाजप उमेदवार मनोहर पर्रिकर हे उपलब्ध उमेदवारांमध्ये नंबर तीनचे करोडपती आहेत.त्यांची मालमत्ता 6 कोटी रूपयांची आहे.पणजी मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले उद्योगपती केनेथ सिल्वेरा हे नंबर वनचे करोड़पती उमेदवार ठरले आहेत.त्यांची एकूण मालमत्ता 26 करोड़ रूपयांची आहे.वाळपई मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवत असलेले आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे 21 कोटींची मालमत्ता असून ते नंबर दोनचे करोड़पती उमेदवार ठरले आहेत.वाळपईचे काँग्रेसचे उमेदवार रॉय नाईक यांच्याकडे 1.3 कोटी तर पणजीचे काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर यांच्याकडे 1.1कोटी रूपयांची मालमत्ता आहे.
गोवा सुरक्षा मंचतर्फे पणजी मधून निवडणूक लढवत असलेल्या आनंद शिरोडकर यांच्याकडे 57 लाख तर वाळपई मधून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या रोहिदास शिरोडकर यांच्याकडे 44 लाखांची मालमत्ता आहे.
उमेदवारांमध्ये गिरीश चोडणकर हे शिक्षक असून इतर उद्योगपती किंवा स्वतःचा व्यवसाय करणारे आहेत.वाळपईचे भाजप उमेदवार विश्वजीत राणे यांनी आपल्या विरोधात एक क्रिमिनल केस असल्याचे जाहिर केले आहे.
उमेदवारांची ही माहिती आणि विश्लेषण गोवा इलेक्शन वॉच एंड असोसीएशन फॉर डेमोक्रॉटीक रिफॉर्म या संस्थेने उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिली आहे.