हार्बर येथील वेस्टर्न इंडिया शिपयार्डचा तरंगता धक्का धोक्यात येऊ लागलेला आहे. हा धक्का समुद्रात कोसळल्यास इंधनामुळे समुद्रात धोकादायक प्रदुषण होण्याची दाट शक्यता आहे. एमपीटीने याची गंभीर दखल घेत आज वेस्टर्न इंडिया विरोधात पोलिस तक्रार दाखल केली.

वास्को हार्बर येथील वेस्टर्न इंडिया शिपयार्ड गेल्या दोन वर्षां पासून बंद आहे.याकाळात कंपनी व्यवस्थापनाने कंपनीच्या तरंगत्या धक्क्याकडेही दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे हा धक्का धोक्यात आलेला आहे. हा तरंगता धक्का सुरक्षीत ठेवण्यासाठी कामगारांनीही यापूर्वी कष्ट घेतले आहेत. मात्र, सध्या परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे.हा धक्का सतत तरंगत ठेवण्यासाठी या धक्क्यात साठणाऱया पाण्याचे वेळोवेळी पंपींग करणे आवश्यक आहे. सर्व बाजूंकडे दुर्लक्ष झाल्याने आता हा धक्का समुद्रात एका बाजूने कलू लागलेला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या धक्क्यावर अधिकच ताण येणार असून पाण्याच्या ताणामुळे कोणत्याही क्षणी हा धक्का समुद्रात कोसळू शकतो.

या तरंगत्या धक्क्यामध्ये मोठय़ा प्रमाणात इंधनही साठवून ठेवलेले असते. धक्का कोसळल्यास इंधनही समुद्रात मिसळणार असल्याने धोकादायक प्रदुषणाला सामोरे जावे लागण्याची भिती आहे. समुद्रावर ही आपत्ती कोसळण्यापूर्वीच सर्वसंबंधीतांनी धोक्यात आलेल्या तरंगत्या धक्क्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासंबंधी काही कामगारांनी एमपीटी व गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडेही तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, हा धोका टाळण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नव्हत्या.आज एमपीटीने वेस्टर्न इंडिया विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे हा प्रश्न सुटेल अशी चिन्हें दिसू लागली आहेत.