देशभर फिरत असलेली सायन्स एक्सप्रेस ही रेल्वे आज मडगाव, गोव्यात पोहचली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सायन्स एक्सप्रेसचे उदघाटन केले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या रेल्वेची जागतिक हवामानबदल ही यावर्षीची संकल्पना आहे. मडगावमध्ये 11 ते 13 जुलै दरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत सायन्स एक्सप्रेसवरील विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. विज्ञानावर आधारीत प्रदर्शनाने रेल्वेचे डबे सजवण्यात आले आहे.

यंदाच्या सायन्स एक्प्रेसच्या देशभ्रमणासाठीचे उदघाटन सुरेश प्रभू यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी 2017 रोजी नवी दिल्ली येथील सफदरजंग रेल्वे स्थानकावर करण्यात आले होते. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन, तत्कालीन पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांची उपस्थिती होती. 17 फेब्रुवारी 2017 ते 8 सप्टेंबर 2017 या काळात सायन्स एक्सप्रेस 19000 किलोमीटर अंतर कापून देशातील 68 स्थानकांना भेट देणार आहे.

विज्ञान प्रदर्शनासाठी निगडीत १६ डबे आहेत, त्यापैकी आठ डबे पर्यावरण मंत्रालयाने सजवले आहेत. यात पर्यावरण विषयक माहिती लावण्यात आली आहे. सायन्स एक्प्रेसमधील विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे, मात्र शालेय विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सायन्स एक्प्रेसच्या अधिक माहितीसाठी www.sciencexpress.in. या संकेतस्थळाला भेट द्यावी तर, सायन्स एक्प्रेससंबंधी काही सूचना, तक्रारी असल्यास sciencexpress@gmail.com या ई-मेलवर किंवा 09428405407 या दूरध्वनी संपर्क साधावा. सायन्स एक्प्रेस विज्ञान प्रदर्शन निःशुल्क आहे. प्रदर्शनस्थळी कॅमेरा, मोबाईल नेण्यास मनाई आहे.