बहीण आणि भावाच नात पवित्र असत. सदैव आपली रक्षा करावी म्हणून बहिण रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधून ओवाळते. गोव्यात मात्र या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना काल रात्री उघड़किस आली. सख्ख्या बहिणला बंद खोलीत तब्बल 10 वर्षे कोंडून ठेवण्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उत्तर गोव्यातील कांदोळी येथे उघडकीस आला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करून तिची सुटका करण्यात आली.
मंगळवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अमानुषतेचा कळस गाठावा, असा हा प्रकार उघडकीस आला. आज या प्रकरणी तिच्या दोघा भावाना आणि त्यांच्या बायकांना अटक करण्यात आली आहे.

पणजीहून महिला पोलीस कांदोळी येथे पीडित महिलेच्या घरी गेले आणि घराबाहेरील एका छोट्या खोलीत डांबून ठेवलेल्या 50 वर्षीय महिलेला त्यांनी तब्बल 10 वर्षा नंतर बाहेर काढले. सुनिता वेर्लेकर असे या महिलेचे नाव आहे. तिचे लग्न झाले होते; परंतु नंतर काही कारणांमुळे ते टिकू शकले नाही. तिला तिच्या पतीने आईच्या घरी आणून सोडले, असा दावा तिचा भाऊ आणि भावजय करत आहेत.
तिच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर भावाने आणि भावजयीने मिळून तिला घराबाहेर असलेल्या छोट्या खोलीत कोंबून ठेवले. फक्त तिला जेवण दिले जात होते. धड आंघोळ नाही, नैसर्गिक विधींसाठी बाहेर जायला वाव नाही, अशा अवस्थेत अत्यंत घाणेरड्या स्थितीत तिला त्या खोलीत ठेवण्यात आले होते. अंगावर घालायला धड कपडेही दिले जात नव्हते.
पणजी महिला पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली तेव्हा त्यांना त्या महिलेच्या अंगावर कपडे घालून नंतर तिला बाहेर काढावे लागले.

बहिणीला खोलीत कोंडून ठेवल्याची कबुली भावाने दिली आहे; परंतु ती मानसिकदृष्ट्या ठिक नव्हती, यासारखी कारणे देऊन आपल्या कर्माचे समर्थनही त्याने केले. ती नेमकी किती वर्षे त्या खोलीत बंद होती, याचा पक्का अंदाज कोणीही देऊ शकत नाही. काहींच्या मते ती ६ वर्षे, काहींच्या मते 10 वर्षे, तर काही जण 15 वर्षे ती खोलीत बंद होती, अशी चर्चा आहे.

या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी काल रात्री साडेअकरा वाजेपर्यंत गुन्हा नोंदविला नव्हता. आज गुन्हा नोंदवून तिच्या दोन भावांना आणि त्यांच्या बायकांना अटक करण्यात आली.सुनीताची बांबोळी येथील गोमेकॉत नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
ईमेलमुळे प्रकार आला उघडकीस
बायलांचो साद या संघटनेच्या प्रमुख सबिना मार्टिन्स यांना ही माहती कोणी तरी ईमेलच्या माध्यमातून दिली होती. तो ईमेल सबिना यांनी पणजी महिला पोलिसांना पाठविला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.